ठाणे : वृत्तसंस्था
एका महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेताच ठाण्यातील आ.जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. आता यावर मुख्यमंत्री काय बोलतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवा येथील पूलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला. मात्र, त्यावेळी या प्रकाराची इतकी वाच्यता झाली नाही. संबंधित महिलेने त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगाने चक्रं फिरली आणि माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.
विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. जे माझ्यासोबत झालंय ते दुसऱ्या महिलेसोबत होऊ नये. हे काय आहे, मध्ये येता म्हणून बाजूला उचलून फेकून देता. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडे वाट मागायला पाहिजे होती किंवा दुसऱ्या वाटेने जायला हवे होते. पण आपल्या हातात ताकद आहे, त्याचा वापर करू, ही जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे. त्यांनी माझ्यासोबत केलंय ते खूप चुकीचं आहे. मी या प्रकाराचा निषेध करते, असे संबंधित महिलेने सांगितले.