जळगाव : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्हा हा केद्र बिन्दुस्थानी येत असतांना दिसत आहे. तर जिल्ह्यात सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे व आ.चव्हाण यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगलेले दिसत आहे.
मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय, असा टोला खडसे यांनी लगावला होता. तर अजिंठा विश्रामगृहात भाजप आमदार मंगेश चव्हाण पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी उत्तर देताना खडसेंवर ही टीका केली. मुक्ताईनगर १९ पैकी ११ उमेदवार हे जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र एकनाथ खडसे असा आखाडा रंगवतात की माझ्यासमोर कुस्ती खेळायला कोणी तयारच नाही? त्या ठिकाणी कोणतीही पात्र संस्था तुम्ही शिल्लक ठेवली नाही, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. एकनाथ खडसे हे स्वतःला एवढे मोठे नेते समजत असतील तर त्यांना माझी भीती बाळगण्याचं कारण नाही. माझ्यासारख्या एवढ्या छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी बोलण्याचं कारण नाही. मात्र वयोमानाने त्यांचा तोल जात असेल, असा टोलाही आमदार चव्हाण यांनी लगावला.
एकनाथ खडसे यांनी स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या फायद्यासाठीच पक्षाला वापरलं. स्वतःकडेच त्यांनी पक्षाला गहाण ठेवलं. एकनाथ खडसे सांगतात की माझा बाप असा होता, माझा बाप तसा होता. मात्र, एकनाथ खडसे यांचा बाप काय धीरूभाई अंबानी नव्हता. खडसे हे वयाने मोठे असल्याने आम्ही काही ठिकाणी त्यांचा आदर करतो. मात्र त्याचा ते गैरफायदा घेतात, असा घणाघात चव्हाण यांनी केला. तुम्ही माझ्या बापावर गेले खडसे साहेब, म्हणून मला तुमच्या बापावर जायचं नाहीये आणि ही माझी पद्धती नाहीये, असे आमदार चव्हाण म्हणाले.
एकनाथ खडसे यांना माझे आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करावं की मी कुणाकडूनही एक रुपया खाल्ला असेल तर. नाहीतर माझ्याकडे त्यांनी कुणाकुणाकडून कसे आणि कधी पैसे घेतले याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे मला आव्हान द्यायला लावू नका, असा इशारा चव्हाण यांनी दिला. ठराविक पातळीपर्यंत एकनाथ खडसेंचा आम्ही आदर करू. मात्र ते खालच्या पातळीवर जातील तर आम्हालाही खालच्या पातळीवर जावे लागेल. आमचा नाईलाज आहे. मंगेश चव्हाण कुणाच्या दबावाखाली काम करणारा कार्यकर्ता नाही. हा ताठ मानेने जगणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही जर माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका. एवढीच आपल्याला विनंती आहे, असे म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिले.