तुम्हाला नेहमी आपली घरातील वरिष्ठ मंडळी सांगत असतील कि आपल्या आहारात लसणाचे प्रमाण जास्त असावे कारण लसणाच्या वापरामुळे जेवणाची छान चव येते. पण लसणाचे याशिवायही अनेक फायदे आहेत. लसूण केस, त्वचा यांच्यासह अनेक रोगांवरही उपायोगी आहे. लसणाचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. लसणात अॅलिसिन नावाचं एक संयुग आढळतं, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलवर प्रभावी आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लसणामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. याशिवाय लसणाचे इतरही अनेक फायदे आहेत.
1. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध प्रकारच्या समस्या जाणवतात. वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. या आजारांमध्ये लठ्ठपणा ( Obesity ) , मधुमेह ( Diabetes ) आणि उच्च रक्तदाब ( Blood Pressure ) यांसारखे आजारांचा समावेश आहे. तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी लसूण हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय आहे. दररोज सकाळी उठल्यावर कच्च्या लसूण आणि कच्ची लवंग चघळल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
2. हिवाळा सुरु झाला आहे. यावेळी शरीराती रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत होते. लसणात असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. यामुळे हृदय निरोगी राहते आणि ह्रदयासंबंधित आजार कमी होतात. यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अनेक प्रकारचे आजार आणि संक्रमणांपासून आपलं संरक्षण करतात.
3. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शरीरातील वाढत्या लठ्ठपणामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर हे घातक ठरू शकते. यादरम्यान, शिरांमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होईल आणि यामुळे तुमचं पचन सुधारेल.
लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण, लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त खाऊ नये, असा सल्लाही दिला जातो. ज्यांना सतत तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असेल, तर त्यांनीही लसूण खाणे टाळावं.