जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका पोलिसांनी मंगळवारी दुपारी निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार, आव्हाणे फाटा परिसरात धडक कारवाई मोहीम राबवली. यात पाेलिसांनी चार ट्रॅक्टर जप्त केली असून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा नदीत सध्या पाणी आहे. तसेच वाळूच्या एकाही गटाचा लिलाव झालेला नाही. तरी गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खु. मार्गे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी दुपारी १२ वाजता मिळाली हाेती. त्यानुसार दुपारी २ वाजता निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळील हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे तर खेडी खु. शिवारातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पाेलिसांनी पकडले. याप्रकरणी दाेन जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.