मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आता थेट रस्ते वाहतूक मंत्र्यांनीच खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेची माफी मागितली. जाहीर सभेमध्ये गडकरींनी लोकांची माफी मागितली असून जुना करार रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत.
नितीन गडकरी मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी गडकरी यांनी खराब रस्त्याबद्दल माफी मागितली. नितीन गडकरी म्हणाले, “400 कोटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 63 किमीचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही. प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुनं काम दुरुस्त करून नवीन निविदा मागवल्या आहेत. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल माफ करा.”
मांडला इथल्या रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी जबलपूर मांडला या ४०० कोटींच्या रस्त्याचं खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावेळी आपण रस्त्याच्या कामावर खूश नाही, असंही गडकरी म्हणाले. शिवाय ४०० कोटींचा खर्च करून ६३ किलोमीटर लांबीचा दोन लेनचा रस्ता बनवणे सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.