मुंबई : वृत्तसंस्था
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
जव्हार-सिल्वासा मार्गावर जयसागर डॅमजवळ नाशिक- सिल्वासा आणि जळगाव- सिल्वासा या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी बसचं प्रचंड नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याला सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे कळतेय.