मुंबई : वृत्तसंस्था
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपलादेखील चिमटे काढले. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी झाली. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या नेत्या ऋतुजा लटके या ५३ हजार ४४१ मतांनी विजयी झाल्या. लटके यांना एकूण ६६ हजार २४७ मतं पडली. तर ‘नोटा’ला १२ हजार ७७६ मतं पडली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नोटाला जेवढी मतं पडली, तेवढीच त्यांना (भाजपला) पडली असती. चिन्ह कोणतंही असलं तरी जनता आमच्यासोबत आहे. मशाल भडकली आणि भगवा फडकला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
ज्या लोकांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, तेच मुळात निवडणुकीत नव्हते. मात्र आमच्या लढाईची सुरुवात विजयाने झाली आहे. पराभवाजा अंदज आल्यानेच भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यापूर्वी बोलतांना ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय म्हणजे जनसेवेची पोचपावती आहे. स्व. रमेश लटके यांनी अंधेरीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार, असं सांगतांना त्या भावूक झाल्या. ”भाजपला सहानुभूती नव्हती. ती असती तर त्यांनी सुरुवातीलाच उमेदवार दिला नसता. त्यांना सर्व्हेमध्ये सगळं कळलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला.” असंही लटके म्हणाल्या.