नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचं संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केलंय. पक्षानं महिलांसाठी स्वतंत्र संकल्प पत्र जारी केलं आहे.
राज्यात सरकार आल्यास समान नागरी संहिता लागू केली जाईल, त्यासाठी एक समिती स्थापन करून तिच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय. याशिवाय, टप्प्याटप्प्यानं 8 लाख नोकऱ्यांची निर्मिती, 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचंही भाजपनं जाहिरनाम्यात म्हटलंय. तसेच मुख्यमंत्री योजनेंतर्गत पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 3000 जोडले जातील, असंही भाजपच्या ठराव पत्रात म्हटलंय.
सध्या या योजनेअंतर्गत केंद्राकडून 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. भाजपनं आपल्या संकल्प पत्रात म्हटलंय की, जर राज्यात सरकार स्थापन झालं तर हिमाचल प्रदेशातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं जाईल. वाहतूक आणि पायाभूत सुविधांबाबत ‘शक्ती’ नावाचा कार्यक्रम सुरू करण्याचं आश्वासन पक्षानं दिलंय. अतिरिक्त जीएसटी 12 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर भाजपचं राज्य सरकार उचलेल, असंही म्हटलंय. शहिदांच्या आश्रितांना आर्थिक मदत, तरुणांसाठी स्टार्टअप, बेकायदा मालमत्तांची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही भाजपनं आपल्या ठराव पत्रात दिलंय.