मुंबई : वृत्तसंस्था
भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.
राज्यात शिंदे व ठाकरे गटाचे भांडण ज्या निवडणुकीपासून सुरु झाले ती निवडणुक म्हणजे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ६६२४७ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.तर नोटाला १२७७६ इतकी मत मिळाली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 90 ते 95 टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता. दरम्यान, ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या.
राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी ऋतुजा लटके याचा विजय आवश्यक होता. आज सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली होती. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता.
मतदारांच्या निरुउत्साहामुळे निवडणुकीत अवघे 31.74 टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2,71,000 मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त 31.74 टक्के म्हणजे 85,698 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी कसं चित्र असेल, याविषयीचा संभ्रम वाढला होता.