मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.
शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची शिंदे यांनी भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, या चर्चेला अर्थ नाही. शिंदे यांनी केवळ पवारांच्या प्रकृतीची भेट घेतली. यातून काही वेगळे घडणार नाही, अशी सावरासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही भेट पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते शिर्डीतल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रुग्णालयात पुन्हा काही टेस्ट होणार आहेत. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती पवारांना आपल्याला दिल्याचे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवर अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत. त्यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिंदे आणि पवार साहेबांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे. ही भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.