मुंबई : वृत्तसंस्था
रवी राणा हे पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे थेट आवाहनही ठाकरे गटाने बच्चू कडूंना केले आहे. तर रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांना मानणारे आमदार आहेत. त्यामुळे फडणवीसांची मान्यता घेऊनच राणांनी ५० खोक्यांचे सत्य जाहीर केले, असा थेट निशाणा आज ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांवर साधला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटले आहे की, आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची (फडणवीसांची) मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते.
शिवसेनेने म्हटले आहे की, प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले. कडू म्हणाले, ‘सत्ता गेली चुलीत! पहिली वेळ आहे म्हणून माफ करू, पण यापुढे अशी चूक केली तर ‘प्रहार’चा वार दाखवून देऊ.’ कडू यांचा हा इशारा जसा राणा यांना आहे तसाच तो सरकारलाही आहे. याचे धोके ठावूक असल्यानेच महाराष्ट्रात असंख्य प्रश्नांचा डोंगर असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या दोन आमदारांचा ‘राडा’ संपविण्यात काही दिवस खर्चावे लागले.
शिवसेनेने म्हटले आहे की, अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या पिंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते व गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही हिसका दाखवला व राणांची बरीच पोलखोल केली.
राणा-कडू वाद मिटलेला नाही
शिवसेनेने बच्चू कडू यांना टोला लगावत म्हटले आहे की, बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱयांचा पैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते.(उप)मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. पण, राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली. त्यावर कडू यांनीही ‘मी 5 तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही.