जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाळू माफियांनी तोंड वर काढले असून आता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव जिल्ह्याचा कारभार घेतल्यापासून जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये दिसून आल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
शहरासह तालुक्यात वाळूची सर्रासपणे अवैध वाहतुक होत असतांनाही तहसीलदारांकडून मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने चक्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर पकडल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात वाळू ठेक्याची मुदत संपुष्टात आली असल्याने अवैधपणे सर्रास चोरी होत आहे. ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातून ही चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मिळाली. त्यानुसार जिल्हाधिकारी मित्तल यांनी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर क्र. एम.एच.-सीवाय- 6161 व रेकी करणारी इंडीका कार अशी तीन वाहने पकडली.



