पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील स्वामी कृषी केंद्रावर बनावट रासायनिक खत आढळले. याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकाने खताचा साठा जप्त करुन, कृषी केंद्रचालक सुनील प्रभाकर सिनकर याच्याविरुद्ध शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी तपासणी केली होती. त्यांना कृषी केंद्रात इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे बनावट खत आढळले होते. त्यांनी खताची विक्री थांबवून त्याचे नमुने खत तपासणी प्रयोगशाळेत पाठवले होते. तसेच इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी ठवरे यांनी, बनावट खताच्या बॅगचे फोटो मुख्यालयात पाठवले होते. ३१ रोजी प्रयोगशाळेच्या अहवाला खतामध्ये अपेक्षित पोटॅशचे प्रमाण ६० टक्केऐवजी फक्त १५.४३ टक्के आढळले होते. तसेच इंडियन पोटॅश कंपनीने या खताची बॅच नंबर, लॉट नंबरची तपासणी केली. त्यात हे उत्पादन बनावट कंपनीचे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे १ रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथकाचे सदस्य जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी मारुती भालेराव, मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी खत जप्त केले.