मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. १० नोव्हेंबर रोजी यात्रेचे नांदेड शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले, एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. बेरोजगारी, महागाई, दडपशाहीसारख्या मुद्द्यांवर लोक स्वतःहून आपल्या व्यथा राहुलजींकडे मांडत आहेत. सर्वसामान्यांत यात्रेबद्दल प्रचंड उत्सुकता, आकर्षण आहे. केवळ काँग्रेसचीच ही यात्रा नाही तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचा या यात्रेत सहभाग आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता “मी पण चालणार’ हे घोषवाक्य आम्ही तयार केले आहे. ८ नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमध्ये मुक्कामी येणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी नायगाव येथे ते पदयात्रेत सहभागी होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही यात्रेत सहभागी होण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. लोकचळवळ निर्माण करण्याचा यात्रेचा हेतू असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मी करत आहे. वकील, डाॅक्टर यांच्यासह समाजसेविका मेधा पाटकर यादेखील “भारत जोडो’शी जोडल्या जाणार आहेत.
१२० किलोमीटरची पदयात्रा नांदेड जिल्ह्यात यात्रेचा चार दिवस मुक्काम असेल. पदयात्रेनंतर काॅर्नर मीटिंगदेखील होतील. १० नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नवा मोंढा येथे दुपारी साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात १२० किमी ही पदयात्रा असेल. राज्यात या यात्रेचा मार्ग तीनशे किमी आहे. हिंगोलीत चार दिवस यात्रेचा मुक्काम राहणार असून यादरम्यान महाराष्ट्रात दोन जाहीर सभा होणार आहेत. पैकी एक नांदेडमध्ये तर दुसरी शेगावला. दररोज २४ किलोमीटरची यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. १२ किलोमीटरनंतर विश्रांती आणि नंतर दुपारी साडेतीन ते सात असा कार्यक्रम असेले.