*धरणगाव / जळगाव ( प्रतिनिधी ) : प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकासकामांमध्ये कुणीही राजकारण आणू नका. गावात एकोप्याने कामे करा. पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांनी गावाची तहान भागवा. उखळवाडी ते अहिरे या गावांच्या दरम्यान धरणी पुलासाठी तब्बल ४.५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेल्या पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. गावासाठी ( जय गुरुदेव भक्तांसाठी) सामाजिक सभागृह व अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन केले. धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे ६८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख गजानन पाटील हे होते.
यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे राज्यभर प्रसिद्ध असल्याने त्यांचा अभिमान वाटतो. गावकऱ्यानी गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाचा उपयोग गावाविकासाठी करून घ्यावा. असे मत व्यक्त केले.
ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थामार्फत शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला. यावेळी सरपंच कैलास पाटील यांनी जय गुरुदेव भक्तांसाठी व गावाच्या लहान – मोठ्या कार्यक्रमासाठी डोण पद्धतीचे सामाजिक सभागृह व ग्रामपंचायत जीर्ण झाल्यामुळे डीपीडीसी मधून ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम मंजूर करण्याची मागणी केली . पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरची मागणी लवकरच मंजूर करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ६ लक्ष निधी खर्च करून गावदरवाज्यापासून ते गाव अंतर्गत रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पेव्हिग ब्लॉकचे लोकार्पण व ६८ लक्ष निधी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाणीपुरवठा योजनेत याचा आहे समावेश
जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी ३ किमी अंतरावरील नारणे गावाजवळ पाण्याचा स्रोत म्हणून बोअरवेल, ३ किमीची पाईपलाईन , ५३ हजार लिटरची क्षमता असलेली पाण्याची टाकी ( जलकुंभ) , २.५ किमीची गाव अंतर्गत पाईपलाईन, पंप हाउस, वीज कनेक्शनसह पंपिंग मशीन आदी बाबींचा या पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. या योजनेसाठी एकूण ६७ लक्ष ७२ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून गावाला पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून योजना मंजूर करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद गटनेते विश्वनाथ पाटील यांनी केले. तर आभार सरपंच कैलास पाटील यांनी मानले. या प्रसंगी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख गजानन पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, उपतालुका प्रमुख मोतीलाल पाटील, खर्दे सरपंच कैलास पाटील, उपसरपंच मनीषाताई कोळी, धानोरा सरपंच भगवान महाजन, सुदर्शन पाटील, गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, प्रशांत देशमुख , पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. पी. वानखेडे ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर कोळी, समाधान कोळी, सुभाबाई भिल, प्रवीण भिल,ज्ञानेश्वर वाघ, संदीप पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन भाईदास कोळी, भिला वाघ यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.