फरार संशयिताच्या शोधार्थ तीन पथके रवाना
लाईव्ह महाराष्ट्र न्युज: जळगावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-१९) या तरुणाचा चॉपर भोसकून खून झाल्याची घटना तांबापुरात घडली होती. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून तिघांवर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या त्यांच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्यासोबत वाद झाला होता. यादिवशी बाचाबाची होवून वाद मिटला होता. मात्र मंगळवारी रात्री संजयसिंग हा घराबाहेर बसलेला असतांना मोहनसिंग व मोनूसिंग यांनी संजसिंगवर चॉपरने वार करुन त्याला जखमी केले. तसेच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता, त्यांच्यावर देखील सोनूसिंग, जगदिशसिंग व सतकौरसिंग बावरी यांनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्यावर तुफान दगडफेक देखील करण्यात आली होती. जखमीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याला वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषीत केले होते. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाच्या घटनेनंतर संशयितांना अटक करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी रात्रभर घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवून मोहनसिंग जगदिशसिंग बावरी, मोनूसिंग जगदिशसिंग बावरी व जगदिशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरीत सोनूसिंग व त्याची आई सतकौर बावरी हे अद्याप फरार आहे. संशयितांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रात्रभर सर्च ऑपरेशन राबवित एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, राजेंद्र कांडेलकर, किरण पाटील, दीपक चौधरी, दत्तात्र्य पद्मार यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तिघांना अटक केली. तसेच फरार असलेला सोनूसिंग व त्याची आई सतकौर बावरी यांच्याशोधार्थ तीन पथके रवाना झाली असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. किरकोळ कारणावरुन तरुणाचा चॉपरने भोसकून निर्घुण खून करणारा संशयित मोनूसिंग जगदिशसिंग बावरी याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चैन स्नॅचिंग, दंगल यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असून त्यांच्यावर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोनूसिंग याच्यावर पोलिसांकडून त्यांच्यावर यापुर्वी हद्दपारीची कारवाई झाली आहे.