अमरावती : वृत्तसंस्था
राज्यात ‘५० खोके एकदम ओके’ हा हास्यासपद जोक आता राजकीय वर्तुळात मोठे घमासान मांडून ठेवले आहे. यामुळे शिंदे सरकार कोसळू हि शकते, असे राजकीय विरोधक दावा करीत आहे.
आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या पन्नास खोके घेतल्याच्या आरोपावर मी नागपुरात पत्रपरिषद घेऊन मी माझ्या व्यक्तव्यावर कायम आहे असे सांगतानाच एक तारखेला ट्रेलर दिसेल. आणि पंधरा दिवस पिक्चर चालेल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी नागपूरात माध्यमांशी बोलताना दिला. मुंबईला जाण्यापूर्वी ते बोलत होते.
मी कोणत्याही आमदाराला स्वत:हून फोन केलेला नाही. मलाच सगळ्यांचा फोन आलेला आहे. पण या सगळ्यामुळे सरकार अस्थिर होणार नाही. कारण मी इतका मोठा माणूस नाही. हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न असून माझी लढाई माझ्या अस्तित्वासाठी आहे असे कडू यांनी स्पष्ट केले. माझा इशारा हा फुसका बार आहे की, बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब केव्हा, कुठे लावायचा हे बच्चू कडूला चांगले माहित आहे. बॉम्ब कसा आहे हे 1 तारखेला कळेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवे, नाही तर आम्ही आमचं काम करू, याचा पुनरूच्चार कडू यांनी केला.
तक्रारीची दखल घेतात की नाही याच्याशी मला काही देणेघेणे नाही. बच्चू कडूचे राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर. राजकारण सोडावे लागले तरी हरकत नाही. एकदा आमच्या डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही आरपारची लढाई करतो. तुम्ही चुकीचे आरोप करीत असाल तर आम्ही असेतसे थोडीच आहोत. आम्ही शेतकरी आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी फोन केला होता. त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. त्यानंतरही राणांचे आरोप सुरूच होते. सांगूनही ते ऐकत नव्हते. म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन त्यांना इशारा दिला. माझ्याकडे पर्याय नव्हता, असे ते म्हणाले. काल शिंदे यांचा फोन आला. आज देवेंद्र फडणवीसांशी बोलतो असे शिंदेंनी सांगितले. या प्रकरणाची सुरूवात मी केली नाही. त्यांनी आधी आरोप केला, नंतर मी बोललो. मी त्यांचे नाव घेऊन कधीच बोललो नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले.