जळगाव : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात शिंदे सरकारचे मंत्री व आमदार गट मोठा करण्यासाठी धडपड करीत असतानाच जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटातील एका आमदार मात्र नाराज असल्याचे जाणवू लागले आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण होत नाहीत, तोच शिंदे गटातील आमदार एकमेकांना भिडले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री व आमदारांच्या या नाराजी नाट्यामुळे जळगाव जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्याच सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला, त्याच पक्षातील माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव एका कार्यक्रमात दिसले, हीच बाब खटकल्याची कबुली चिमणराव पाटील यांनी दिली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला, त्याच पक्षातील माझ्या प्रतिस्पर्धी आमदाराला निधी द्यायचा, व त्यांना मोठं करायचं, ही चुकीची बाब असल्याचं सांगत चिमणरावांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदाराला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी योजनांसाठी निधी दिल्याने आमदार चिमणराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. आता आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव दिसल्याने चिमणराव पाटलांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच पुन्हा चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली असून सध्या या दोघांमधील वाद विकोपाला गेला असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान नेमकी काय नाराजी आहे, याबाबत आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी माझ्या प्रतिस्पर्धी असलेल्या आमदाराला निधी मंजूर करून दिला असून त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मुलासोबत मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी हजेरी लावली. हीच बाब मला खटकली. आणि ज्यांच्यामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यांना मोठं करण्याचं काम सुरू आहे , असं म्हणत नाव न घेता आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहित असावे म्हणून मी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, असेही आमदार चिमणराव पाटील म्हणाले. एकंदरीतच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान एकाच सरकारमधील मंत्री व आमदाराचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला असून एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारामुळे टेन्शनमध्ये असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन आणखीनच वाढलं आहे. आता या मंत्री व आमदाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी समजूत घालतात व याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.