जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील फत्तेपूर येथे ऐन दीपावलीच्या दिवशीच विजेचा धक्का लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा सोमवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मयत वायरमनची नावे आहेत. गणेश हे अनुकंपाखाली नोकरीला लागले होते तर सुनील हे झिरो वायरमन होते.जनतेला दिवाळीच्या दिवशी उजेडात राहण्यासाठी ते वीज वितरणचे कर्तव्य निभावीत असतांना त्यांनी कुठलाही विचार न करता आपले काम चोखपणे बजावीत होते, मात्र त्यांच्याच घरात आज अंधार निर्माण झाला आहे.
फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि सुनील हे तिथे पोहोचले. या तारेला हात लावताच गणेश यांना शॉक लागला आणि ते जागीच ठार झाले. तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील यांचा रस्त्यात मृत्यू झाला. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. गणेश व सुनील चव्हाण यांचे मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्या केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. सुनील चव्हाण याच्या पश्चात वृध्द आई वडील, पत्नी व मुलगा आहे. सुमारे तीन तासानंतर नातेवाइकांना परिवारात तोच कमविता होता.
गिरीश महाजनांकडून आश्वासन
दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि शासनाकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.