जळगाव : प्रतिनिधी
मी डॉक्टर असल्याने कोणाला गोळी द्यायची, कोणाला इजेक्शन तर कोणाच ऑपरेशन करायच हे मला माहित होत. त्यानुसारच मी दोन वर्ष याठिकाणी काम केले. काम करतांना कोणाचीही हानी होणार नाही या दृष्टीने काम केले असल्याचे मत तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले. जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून दुपारी पदभार स्विकारला. त्यानंतर पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे मावळत्या पोलीस अधीक्षकांना पोलीस दलाकडून निरोप देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नूतन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, गृहदलाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित उपस्थित होते. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी मनोगत व्यक्त करीत पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात वेगवेगळ्या स्तरावर काम करायला मिळाले. देव माणूस म्हणजे वरिष्ठांकडून एक प्रकारे शिवी असते. प्रत्येक वेळी दांडुक्याने काम होत नसते आणि माझा त्यावर विश्वास नाही. जिल्ह्यात पोलिसांना संस्थांनी सहकार्य केले असून चांगल्याला चांगल म्हणणारा जिल्हा आहे. नागरिकांना जो अधिकारी चांगले काम करतो त्याच्या मागे जळगावासीय नक्कीच उभे राहत असल्याचे ते यावेळी म्हणाले. काम करतांना ताण तणाव हा येतच असतो. परंतु मी कधीही तणावात काम केले नाही. त्यातच मला कुटुंबिक पाठबळ तर होते त्यातच खंबीर साथ ही माझ्या पत्नीची होती. त्यामुळे कुठलेही काम हे दबावाखाली न करता निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने करा असा सल्ला देखील मावळते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांना दिला.
नूतन पोलीस अधीक्षकांनी ओढली जीप
जिल्हा पोलीस दलाकडून मावळते पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निरोप देण्यात आला. यावेळी मंगलम हॉलपासून पोलीस बॅण्डने गितांचे सादरीकरण करुन त्यांची ओपन जीपमध्ये फुलांचा वर्षाव करीत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नूतन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्वत: या कार्यक्रमात सहभागी होवून त्यांनी वाहनाचा दोर ओढून मावळत्या पोलीस अधीक्षकांना निरोप दिला. आपल्या सहकार्याला निरोप देण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या भूमिकीचे अधिकार्यांकडून कौतुक होत होते.