मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता सत्तांतरानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर आले. पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीपूर्वी एका स्पेशल डिनरला हजेरी लावली. यावेळी शिंदेंनी पवार माझ्या व भाजप नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांची रात्रीची झोप उडेल, अशी मिश्किल टिपणी केली.
एकनाथ शिंदेंनी यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही. पण त्याचा रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. शिंदे म्हणाले – ‘पवार, फडणवीस व शेलार एकाच व्यासपीठावर आलेत. यामुळे काही लोकांची रात्रीची झोप उडू शकते. पण ही राजकारण करण्याची जागा नाही. आम्ही सर्वजण खेळांचे प्रशंसक व समर्थक आहोत. त्यामुळे आम्ही आपसातील राजकीय मतभेद विसरुन विकासासाठी एकत्र आलोत.’
शिंदे गटाच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार कोसळले होते. शिवसेनेच्या 55 पैकी 39 आमदारांनी शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपशी आघाडी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री केले. तर स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यंमत्री झाले.
एमसीएची आज निवडणूक
मुंबई क्रिकेट संघटनेच्या विविध पदांसाठी आज म्हणजे 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही ही निवडणूक लढवण्यासाठी मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी पवार व नवनियुक्त बीसीसीआय कोषाध्यक्ष तथा भाजप नेते आशिष शेलार यांच्या संयुक्त पॅनलने आपली उमेदवारी दाखल केली आहे.