मुबई : वृत्तसंस्था
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य भारतातील उर्वरित भागांमधून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य आणि लगतच्या नैऋत्य बाजूस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे परिवलन आहे. तसेच कर्नाटक किनार्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ परिवलन आहे. या प्रभावामुळे शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे मुंबईतून मान्सून माघारीला आणखी काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्याच्या किनार्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किमीवर चक्रीवादळाचे परिवलन आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे.