लाईव्ह महाराष्ट्र | मध्यस्थ व दलालांच्या मार्फत नागरिकांना परस्पर भेटून रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करून लुबाडत असल्याचा प्रकार धरणगाव तहसील कार्यालयात घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधात धरणगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच धान्य विषयक इतर कामकाजासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष धरणगाव पुरवठा शाखा अथवा माझी भेट घ्यावी. तसेच अतिरिक्त पैशांची मागणी करत असलेल्यांची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
स्वस्त धान्याच्या मिळकतीसाठी नागरिक रेशन कार्ड तयार करून घेण्यास तहसील कार्यालयात येत असतात. मात्र त्या ठिकाणी मध्यस्थ व दलालांमार्फत गरजू नागरिकांची पैसे घेऊन आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. याविरोधात तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी धरणगाव नागरिकांना आवाहन केले असून फसवणूक करणाऱ्या मध्यस्थ वा दलालाची तक्रार करून त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे. रेशन कार्ड साठी शासकीय फी व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त व्यवहार करू नये असेही तहसीलदार देवरे यांनी यावेळी सांगितले. असे करणारा कोणी व्यक्ती आढळल्यास 7745038567 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.