अल्पावधीतच सुपरहिट झालेला चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. आलियाने या चित्रपटात स्मगलिंग आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगुबाईची भूमिका साकारल्याने तिला ट्रोलही केले गेले. पण चित्रपट पाहून आणि विशेष करून आलियाचा अभिनय पाहून सर्वांचीच बोलती बंद झाली. या चित्रपटाला आणि पर्यायाने आलियाला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.
आज, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पाहा ‘गंगुबाई काठियावाडी’चा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर ‘झी सिनेमा’वर होणार आहे. त्या निमित्ताने आलियाची बातचीत करण्यात आली. तेव्हा अजूनही मी गंगुबाईला माझ्यापासून वेगळं करू शकले नाही, असं आलिया म्हणाली. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट का स्वीकारला? तुझ्यासारख्या एका आघाडीच्या नायिकेसाठी ही अगदी अपारंपरिक भूमिका होती. तू तिच्यासाठी कोणती पूर्वतयारी केलीस?असा प्रश्न आलियाला विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली, ‘गंगुबाई आपल्या भोवतीची परिस्थिती फिरवते आणि स्वत:साठी एक अभूतपूर्व जीवन निर्माण करते. ती वरकरणी निर्लज्ज वाटली, तरी मनाने संवेदनशील आहे, ती कणखरही आहे आणि दुबळीही. ती तशी स्वार्थी असते आणि तरीही ती नि:स्वार्थीपणे वागते. तिचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला धक्के देत राहतं. त्यामुळे या परस्परविरोधी भावभावना व्यक्त करण्याच्या उत्सुकतेपोटी मी हा चित्रपट स्वीकारला.’
पुढे ती म्हणते, ‘गंगुबाई ज्या विश्वात राहते, तिथे मी आजपर्यंत कधी गेलेली नाही. माझी पूर्वतयारी म्हणजे संजयसरांच्या (संजय लीला भन्साळी) सूचना पाळणं हीच होती. ती गंगू नावाची पोरसवदा तरुणी असल्यापासून आम्ही चित्रपटाला प्रारंभ केला आणि तिचं रुपांतर गंगुबाईत व्हायचं होतं. माझ्या संशोधनाचा भाग म्हणून मी हुसेन झैदी यांचं पुस्तक वाचलं. या विषयावरील काही चित्रपट पाहिले. या महिलांची देहबोली आणि भाषा आत्मसात करण्यासाठी काही डॉक्युमेंटरी पाहिल्या. ही व्यक्तिरेखा, तिचं बोलणं, आवाजाची पातळी, इतर आवाज याखेरीज इतरही अनेक गोष्टी या व्यक्तिरेखेला इकडे-तिकडे खेचीत होत्या. त्यात हा विशिष्ट गुजराती काठियावाडी शब्दोच्चार होता. या भूमिकेसाठी मला ती भाषा येणं आणि तिचा अचूक उच्चार करणं आवश्यक होतं. मी प्रथमच या चित्रपटात इतकी खालच्या पातळीवरची भाषा वापरली आहे. व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी काही काळ जावा लागतो. पण मला हे स्पष्टपणे आठवतंय जेव्हा माझ्या अभिनयावर संजयसर खूप खुश झाले होते. तेव्हा मला जाणवलं की मी आता या व्यक्तिरेखेत प्रवेश केला आहे. माझ्या आयुष्यातील तो सर्वात समाधानकारक सर्जनशील अनुभव होता.’