मुंबई : वृत्तसंस्था
गुजरातच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले मैदान तयार केले आहे, यात भाजपनेही या लढतीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली असून, गृहमंत्री अमित शाहांनी शनिवारी अहमदाबाद येथून परदेशात स्थायिक असलेल्या गुजराथी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारने गुजरातच्या विकासासाठी काम केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला जागतिक स्तरावर वेगळी ओळख दिली आहे.
शहा म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या विजयात परदेशी गुजरातींनी (NRGs) नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. गुजरातमधील खेड्यापाड्यातील रहिवासी हे लोक रोल मॉडेल म्हणून ओळखतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे परदेशात स्थायिक असलेल्या एनआरआय नागरिकांनी भाजप आणि नरेंद्रभाईंचा संदेश आणि देशाच्या विकासाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी भाजपचे दूत बनण्याचे आवाहन केले आहे. यावेऴी त्यांनी परदेशात राहणाऱ्या गुजरातींचे कौतुक केले. ते म्हणाले की, गुजराती जिथे जिथे स्थायिक आहेत, त्यांनी त्या राष्ट्रांचा गौरव केला आहे आणि देशाच्याच नव्हे तर, संपूर्ण जगाच्या विकासात योगदान दिले आहे. 1990 पासून जेव्हा-जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा गुजरातच्या जनतेने भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले. परदेशात राहणाऱ्या गुजरातींचाही या विजयांमध्ये महत्त्वाचा वाटा होता. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही पंतप्रधान मोदींनी विकासाला नवी दिशा दिली. घराणेशाही, जातिवाद आणि तुष्टीकरण याशिवाय निवडणुकीचे राजकारण शक्य आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.