जळगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे सध्या रुग्णालयात असल्याची माहिती आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. मूत्रमार्गाचा संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीमध्ये अडकले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये गिरीश चौधरी हे अटकेत आहेत. तर एकनाथ खडसेंना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.