चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथे कोयत्याचा धाक दाखवून,अवघ्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा रुमालाने तोंड दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुंजन सोनू ठाकरे (वय २ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव असून, अरविंद कैलास पाटील (वय ४०, रा. पिंप्री प्र.दे.) असे संशयिताचे नाव आहे. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रावले यांनी भेट दिली. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंप्री प्र. दे. येथील इंदिरानगर भागात शोभना सोनू ठाकरे (कोळी) (वय २७) ही महिला पती, मुले व आजोबांसह राहते. तिचा पती मोलमजुरी करतो. ११ रोजी रात्री १० वाजता सर्वजण झोपी गेले. पहाटे शोभना हिला घरात कुणीतरी आल्याचा आवाज आला. तो गावातीलच अरविंद सांगितले. कैलास पाटील हा असल्याचे शोभनाने ओळखले. संशयिताने कोयत्याचा धाक दाखवत घरातील बिर्याणी खाल्ली. तसेच चिमुकली गुंजनच्या तोंडावर रुमाल दाबला. काही वेळाने संशयित अरविंद घराबाहेर पळून गेला. दिवस उजाडल्यानंतर मेहुणबारे पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला. मेहुणबारे पोलिसांत कलम ३०२, प्रमाणे गुन्हा दाखल झाला
तपासाच्या सूचना दिल्या
गुन्ह्याचा आढावा घेतला असून तपासाबाबत सूचना केल्या आहेत. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले.