जळगाव प्रतिनिधी : आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी संधी असून, कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बुथ रचना मजबूत करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
जळगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट आणि गण प्रमुखांच्या मेळाव्यात श्री. देवकर बोलत होते.
ते म्हणाले, की सध्याची राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी चालून आली आहे. यापूर्वीही ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व वाढविण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यासाठी घराघरात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचले पाहिजे. बूथ लेव्हलवर सूक्ष्म पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी यामध्ये योगदान दिल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या राष्ट्रवादीच्याच ताब्यात असतील, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.
मेळाव्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाटील (राजू सर), मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सपकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप पाटील, जिल्हा सरचिटणीस हेमंत पाटील, संघटक गोकुळ चव्हाण, सरचिटणीस योगराज सपकाळे, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण पाटील, जयराम सोनवणे, रवी देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय एस महाजन, तालुका उपाध्यक्ष विजय बारी, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस अशोक सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याला जळगाव तालुक्यातील सर्व गट गणप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.