भुसावळ : प्रतिनिधी
शेतकऱ्यांची व शासनाची तब्बल ५ लाख ८४ हजार ४९५ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव बु येथे विना परवाना मुदतबाह्य कीटकनाशक साठवणूक करून विक्री करत असताना शेतकऱ्यांची व शासनाची विना परवानगी परवाना न घेत फसवणूक केली. याप्रकरणी संशयित आरोपी नितीनचद बन्सीलाल जैन (रा.पिंपळगाव ता.भुसावळ), अतुल लढा (मामा चौक, जालना), भिलुलाल रामप्रसाद कासट (ता.सेलू, जि.परभणी) यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी परशुराम दळवी हे करीत आहेत.
दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव बुद्रुक तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडे विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशकचा साठा असल्याची गुप्त माहितीच्या आधारे, कृषी सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने सदर माहितीच्या आधारे विजय दगु पवार (मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, अभिनव माळी (तालुका कृषी अधिकारी भुसावळ), धीरज बडे (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पंचायत समिती भुसावळ), कपिल सुरवाडे (विस्ताराधिकारी पंचायत समिती, भुसावळ) या पथकाने संयुक्तपणे तपासणी केली. यावेळी त्यांना सर्वे नंबर 239 घर क्रमांक 744 व 745 या ठिकाणी विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा अनधिकृतपणे साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. सदर प्रसंगी संशयित आरोपी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडील साठा जप्त करून त्याची मोजदाद व पंचनामा पंचा समक्ष करण्यात आला. सदर पंचनामा व कारवाई प्रसंगी वरणगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ व पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस हवलदार मनोहर पाटील, पोलीस शिपाई प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. वरणगाव पोलीस स्टेशन तिघांविरोधात विजय दगू पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या कारवाईमध्ये एकूण 5 लाख 87 हजार 495 रुपये मात्र इतका कीटकनाशकाचा साठा जप्त केलेला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन वरणगाव हे करत आहे.