युवा संसदेमधून समाज आणि देशाचे कल्याण करणारे सक्षम नेतृत्व उभे राहू शकते -खासदार मा.उन्मेष पाटील
जळगाव प्रतिनिधी: मूळजी जेठा महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठ स्तरीय युवा संसद कार्यशाळा आयोजित करण्यात आली संसदीय कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव महाविद्यालयीन तरुणांना घेता यावा त्या माध्यमातून देशाचा देशाचे भावी सुजाण नागरिक आणि नेते तयार व्हावेत याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या युवा संसद कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे खासदार उमेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटकीय मनोगतात खासदार उमेश पाटील म्हणाले की “ सन 2000 मध्ये याच महाविद्यालयात केंद्रीय संसदीय समितीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संसद प्रशिक्षण शिबिरामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेस तत्कालीन आमदार एकनाथ खडसे, खासदार वाय.जी महाजन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील विधान परिषदेचे तत्कालीन सभापती माननीय अरुण भाई गुजराती, सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित यांनी त्या शिबिरात केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि संसदीय कार्य कामकाजाच्या प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल जे काही आमच्या समोर सादर केले, त्याचा मला आमदार असताना आणि आता खासदार असताना उपयोग होत आहे. माझ्यासाठी ती सुवर्णसंधी होती ज्यामुळे माझ्या ध्येयात आणि कार्यशैलीत बदल आणि विकास होत राहिला.खऱ्या अर्थाने माझे नेतृत्व तेव्हापासून आकार घेऊ लागले. राजकारण आणि समाजकारण याचा खरा परिचय सन 2000 मध्ये मू.जे.महाविद्यालयातच झालेल्या त्यावेळच्या राष्ट्रीय युवा संसद शिबिरामध्ये झाला. सुमारे २२ वर्षांनतर पुन्हा तशी कार्यशाळा होत आहे आणि तिचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, हा माझ्यासठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”
पुढे सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते म्हणाले की “ विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे आपल्या दृष्टिकोनात कार्यपद्धतीमध्ये विकास करणे शक्य होते. येथूनच आपल्याला कळते की जगाला विवेकाने कसे बघावे. माझा तरुण पिढीला हा मोलाचा सल्ला असेल त्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, परिस्थितीचे आकलन करावे, समाजाला समजून घ्यावे चांगले शिक्षण घ्यावे आणि त्याद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा. तुम्ही सुजाण बना, कार्यक्षम व्हा आणि संधी मिळेल तेव्हा आपल्या गावाचे, शहराचे, राज्याचे किंबहूना देशाचे नेतृत्व करा.”
कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सांगितले की “ युवाशक्ती आशावादी आणि विधायक असते. समाजातील काही नकारात्मक गोष्टींच्या प्रभावामुळे त्या शक्तीचा प्रवाह वाईट दिशेने जातो. मात्र वेळोवेळी या प्रचंड शक्तीचा सदुपयोग करून आपल्या भारतीय लोकशाहीने जगाला चांगल्या आणि टिकाऊ शासन व्यवस्थेचा वस्तुपाठ दिला आहे. संसदीय कार्यप्रणाली कशा पद्धतीने संचालित केली जाते याचा प्रत्यक्ष नमुना आज युवा संसद कार्यशाळेतील अभिरूप संसदेमधून आपणास पहावयास मिळणार आहे. इतिहास साक्षी आहे आपल्या शेजारील राष्ट्रांचा लष्कर शाहीवर आणि हुकूमशाहीवर जो भर राहिला त्यामुळे त्यांच्याकडील विविध व्यवस्थांना धक्के लागलेले आहेत या उलट भारतातील संसदीय कार्यपद्धतीच्या सुव्यवस्थित व्यवस्थापनामुळे आपण जगाला एका चांगल्या लोकशाही मूल्यांचा परिचय करून दिला आहे. आपल्याकडे इतरांसारखी राजकीय अस्थिरता अथवा गुंतागुंतीचे थोडे काही उदाहरण सोडले तर त्याचे दाखले मिळत नाहीत. स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण खेड्यातील ग्रामपंचायत पासून ते दिल्लीतल्या संसदेपर्यंत एकाच टिकाऊ आणि नियोजित व्यवस्थित रचनेला स्वीकारलेले आहे. भारतीय त्याच्या मताला येथे सर्वोच्च स्थान आहे आपण बुलेटवर नाही तर बॅलेट वरती विश्वास ठेवणारे नागरिक आहोत. हा संस्कार आणि संसदीय रचनेचा परिचय आजच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होणार आहे.”
प्रमुख उपस्थिती लाभलेले क.ब.चौ.उ.म,विद्यापीठ संचालित विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी म्हणाले की “ आपल्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी उपक्रम कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकसित व्हावे, त्यांना राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्थेची सुयोग्य समझ निर्माण व्हावी, त्यांच्यामधून चांगले नेतृत्व मिळावे आणि त्यांच्या हातून समाजाची व देशाची सेवा घडावी. सामान्य व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी पत्करावा याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या युवा संसद कार्यशाळेचे आज मू.जे.महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.”
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून सहभागी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्य आणि देशाचे हित जपण्याचा मोलाचा सल्ला दिला.
उद्घाटन सत्र झाल्यावर धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे डॉ.संतोष खत्री यांचे संसदीय कार्यप्रणाली विषयावरती मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. त्यांनी उपस्थित संसदेमध्ये ज्या विविध प्रकारच्या रचना आहेत त्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय लोकशाही, तिची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी यावर विविध दाखले दिलेत. ते असे म्हणाले की “ भारतीय मतदान प्रक्रिया जगातील सर्वाधिक व्यवस्थित पद्धतीने चालणारी प्रक्रिया आहे. आपण प्रजासत्ताक गणराज्याचा स्वीकार केला असल्याकारणामुळे पाच वर्षांनी प्रजा आपला प्रतिनिधी ठरवत असते त्यासोबतच संसद खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या अधिवेशनांद्वारे आपल्यासमोर येते. भारतीय नागरिकांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, देशाच्या आर्थिक आणि संरक्षण क्षमता वाढविण्याकरता घेण्यात येणारे निर्णय आणि एकूण राष्ट्र हितासाठीचे ध्येयधोरणे या अधिवेशनांच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. या सर्व प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजेत यामध्ये प्रश्नोत्तरांचा तास आणि त्यावर होणारी चर्चा, संसदेत मांडण्यात येणारे विविध प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, विशेषाधिकार प्रस्ताव आणि हक्क भंग प्रस्ताव असे विविध प्रस्ताव हे सर्व या अधिवेशनांमध्ये सादर करण्यात येतात. याची विशिष्ट प्रकारची नियमावली भारतीय संविधानामध्ये आपल्याला पहावयास मिळते.” द्वितीय सत्रामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या अभिरूप संसदेसाठीच्या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या त्यानंतर त्यांच्या मधूनच संसद प्रणाली मधील विविध पदे देण्यात आली त्यासोबतच त्यांना कशा पद्धतीने प्रश्न मांडायचे आहेत त्यावर ते उत्तर द्यायचे आहेत याचे प्रशिक्षण सुद्धा या सराव सत्रात देण्यात आले.
मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अभिरूप संसद तयार करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संसदीय कार्य प्रणालीचा अनुभव घेतला. ज्यामध्ये मू,जे.ची कु. सानिका पाटील हीची सभापती पदावर निवड करण्यात आली. अमळनेर येथील निर्भय सोनार या विद्यार्थ्यांची पंतप्रधानपदी निवड झाली. प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा चौधरी हिची विरोधी पक्ष नेता, बेंडाळे कॉलेज ची प्राजक्ता राठोड हीची उप सभापती, मणियार विधी महविद्यालयाचा रितिक कुमावत याची गृहमंत्री पदी, तर एम.जे.मधील राज तायडे याची संरक्षण मंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष शपथ सुद्धा घेतली. सहभागी सर्व संसदीय खासदारांनी (विद्यार्थ्यांनी) विविध प्रश्नोत्तरे आणि योजनांवर चर्चा केली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुमचे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले उपजत गुण त्यांना भविष्यात खूप पुढे घेऊन जातात आणि त्यांच्या करिअरला पूरक ठरतात. विविध कार्यशाळांच्या माध्यमातून तयार झालेले विद्यार्थी हे समाजाचे आणि देशाचे हित करणारे सेवक बनतात. अभिरूप संसदेच्या माध्यमातून आज या कार्यशाळेत देशाच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या लोक तांत्रिक मूल्यांच्या मंदिराचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचा उपयोग त्यांनी समाजाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी करावा” अभिरूप संसदेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संसद पटूंचा पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक संसद कार्यक्रमाचे संयोजक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. संजय हिंगोणेकर, तसेच डॉ. राजू पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर योगेश महाले यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी, प्रा.के.के.वळवी, प्रा.विजय लोहार, डॉ.जुगल किशोर दुबे, डॉ.अखिलेश शर्मा, डॉ. विलास धनवे, डॉ.एल.पी.वाघ, प्रा. दिलवरसिंग वसावे, प्रा.श्रद्धा जोशी, डॉ.ललिता निकम, डॉ.योगिनी राजपूत यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला विविध महाविद्यालयातून सुमारे 120 विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.