पुणे : वृत्तसंस्था
चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या त्यांना काही वाटणार नाही. मात्र, मोदी आणि शहांना काही बोलल्याचे त्यांना चालणार नाही. हा किस्सा पुण्यातील सत्कार समारंभात स्वतः मंत्री चंद्रकांत पाटीलांनी सांगितला आहे. पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.
काय म्हणाले पाटील?
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुणे भाजपकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पाटलांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेले चालणार नाही. त्यामुळेच तुम्ही हातकंणगलेमधून लोकसभेला पडलात, असे एका केंद्रीय नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा पाटलांनी केला.
पुण्यात उचलून टाकले नाही
दिल्लीतील लोकांनी उमेदवारी देताना उगाच पुण्यातून उमेदवारी दिली नाही. त्यामागे काही कारणे आहेत. मात्र, सत्ता गेल्याने अडीच वर्षे आपल्याला काही करता आले नाही. आता सातारा, सांगली, पुणे, सोलापूर सगळे साफ करायचे आहे, असे म्हणत विरोधकांना इशारा दिला आहे.
पवारांचा बालेकिल्ला काबीज करू
राजू शेट्टींना लोकसभेच्या वेळेस वाटत होते की, आपला पराभवच होऊ शकत नाही. मात्र, त्यांना सव्वालाख मतांनी मी प्रदेशाध्यक्ष असताना हरवल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. माढ्यातून स्वत: पवार उभे राहणार होते काय झाले? आमच्या निंबाळकरांना 84 हजार मतांनी निवडून आणले, असे म्हणत आपल्या पुण्यात येण्यामागे भाजपने पुण्यात लक्ष घातले असून आता पवारांचा बालेकिल्ला आपण काबीज करणार, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे.