जळगाव : प्रतिनिधी
रात्रीच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला हत्यार दाखवीत सोन्याची चैन लांबविल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील महिला पोलीस आरती मोतीलाल कुमावत (वय ३२, रा.पोलीस सोसायटी, पोलीस मुख्यालय) ह्या दि ६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील परेड ग्राऊडवर शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी कुणी तरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या जवळ येत अंधाराचा फायदा घेत त्यांना चाकू सारखे हत्यार दाखवून बळजबरीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस महिला यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस स्थानक गाठत घडलेली घटना सांगून अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.उ.नी.प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.