कोरोना काळात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. पण या काळातही काही शेअर्सने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे, असाच एक शेअर म्हणजे टाटा ग्रुपचा टाटा पॉवर (Tata Power) हा शेअर. केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले.
टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांच्या वर्तवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये टाटा पॉवरच्या शेअरसाठी 262 रुपयांचे टारगेट निश्चित केले होते. सध्या त्याची बीएसईवर 219 रुपये किंमत आहे.
टाटा पॉवरने 2023-27 या आर्थिक वर्षासाठी हरित ऊर्जेवर (Green Energy) आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी 1 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करणार आहे आणि त्यातील 80 टक्के गुंतवणूक हरित व्यवसायात केली जाईल. याद्वारे, कंपनीने आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत आपला महसूल 3 पट आणि निव्वळ नफा 4 पट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 42.6 हजार कोटी रुपये आणि निव्वळ नफा 2.3 हजार कोटी रुपये होता.
5 वर्षात ग्रीन बिझनेस टरगेट व्यतिरिक्त, कंपनीचे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन स्पेसमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा पॉवरचे शेअर्स मागच्या वर्षी 4 ऑक्टोबर 2021 ला 164 रुपयांवर होते, जे एका वर्षातला विक्रमी नीचांक आहे. पण मग यात पुन्हा तेजी दिसायला लागली आणि हा शेअर 7 एप्रिलला 298 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या हा शेअर 36 टक्के सवलतीवर उपलब्ध आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.