जळगाव (प्रतिनिधी );- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये व प्रशाळांसाठीचे येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे १ सप्टेंबर पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे.
देशातील कोवीड- १९चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत आनलाईन वर्ग सुरू राहतील . प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
६ आगस्ट पासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया आनलाईन/ आफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. नवीन शैक्षणिक सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान घेतल्या जातील. १७ ते २३ जानेवारी २०२२ दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी असेल. त्यानंतरचे सत्र २४ जानेवारी २०२२पासून सुरू होईल. या सत्राच्या परीक्षा १ मे २०२२ ते ५ जून २०२२ या कालावधीत होतील. ६ जून ते १५ जून दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर १६ जून २०२२ पासून पुढील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे.