मुंबई : वृत्तसंस्था
दसरा मेळाव्यासाठी अवघ्या दोन दिवस राहिलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिंदे हे खरोखरीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असून, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, मुंबईत 227 ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय राज्यात कॅथलॅबदेखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.