एरंडोल उप विभागीय अधिकाऱ्यांनी स्थापन केली चौकशी समिती
धरणगाव प्रतिनिधी : खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी करीत त्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी पथक नेमून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी विद्यमान सदस्य अशोक शालिग्राम भोलाणकर यांनी खोटे दस्तावेज सादर करून धरणगाव तहसील कार्यालयाकडून मिळविलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळविल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.संजय संतोष कांडेलकर, राजुरा यांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी यांचे कडे दि. ७ जून २०२२ रोजी केली होती.
धरणगावचे तहसीलदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता न तपासता प्रकरण मंजूर करून उप विभागीय अधिकारी एरंडोल यांचे कडे पाठविले त्यांनतर उपविभागीय कार्यालयात सुद्धा कागदपत्रांची खातरजमा न करताच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले धरणगाव तहसीलदार आणि एरंडोल उप विभागीय अधिकारी यांनी यात मोठा आर्थिक गैर व्यवहार केल्याचा आरोप कांडेलकर यांनी केला आहे.
चौकशी पथकाची नियुक्ती –
दरम्यान दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी या जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमून एका महिन्यात चौकशी संपवून त्याचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांच्या कडे सुपूर्द करावा तसेच सदर अहवाल तपासून तहसीलदार यांनी तो उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा असा स्पष्ट आदेश दिला. या समितीत निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पाळधी मंडळ अधिकारी आणि बांभोरी प्र.चा येथील तलाठी यांचा समावेश आहे. परंतु महिना उलटून देखील अद्याप याप्रकरणी पथकाने चौकशी केली नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.