जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मजूर संस्थांना सर्व विभागांकडून ३३ टक्के कामे मिळावीत, अन्यथा मजूर फेडरेशनतर्फे संबंधित विभागांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मजूर फेडरेशनच्या सभेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिला. त्यासोबतच त्यांनी मजूर फेडरेशनच्या वर्षभरातील कामकाजाचे कौतुक केले. जिल्हा मजूर फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. ३०) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत मार्गदर्शन करताना श्री देवकर म्हणाले, की राज्यभरातील बऱ्याच मजूर फेडरेशनची स्थिती राजकीय हस्तक्षेपामुळे व कामे वाटपातील दुजाभावामुळे खराब झालेली आहे. मात्र जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने फेडरेशन निरंतर प्रगतीपथावर आहे. फेडरेशनकडून सर्व संस्थांना सर्वसमावेशक पद्धतीने कामे वाटप केले जात असल्याने महाराष्ट्रातील इतर फेडरेशन पुढे नवा आदर्श आपण उभा केला आहे. २००९ ते १४ या कालावधीत मजूर संस्थांवर जाचक अटी लादण्याचे धोरण आपण हाणून पाडले. त्यामुळे आज संस्थांना तीस लाखापर्यंतची कामे मिळू लागली आहेत, ही समाधानाची बाब आहे. अमळनेर तालुक्यातील कार्यकारी अभियंता राजपूत यांनी मजूर संस्थांना कामे देणे बंद केले. त्या विरोधात आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच जळगाव जिल्हा परिषदेतकडूनही मजूर संस्थांना कामे देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून, संस्थांना ३३ टक्के कामे मिळालीच पाहिजेत, या मागणीसाठी फेडरेशन तर्फे लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल, सर्व मजूर संस्थांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी देवकर यांनी केले.
फेडरेशनचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. फेडरेशनचला ऑडिटमध्ये अ दर्जा मिळाला असून, २०२१- २२ मध्ये फेडरेशनला ५१ लाख ३२ हजार ४०९ रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. सभेत प्रकाश पाटील, श्री धोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर फेडरेशनचे सभापती लीलाधर तायडे, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक वाल्मीक पाटील, पुरुषोत्तम चौधरी, अजय सोनवणे, मधुकर पाटील, ईश्वर पाटील, रोहिदास पाटील, घनश्याम खैरनार, विमल पाटील, मंगला पाटील, राजेंद्र कोलते, देवकर पतपेढीचे व्यवस्थापक विशाल निकम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.