जालना : वृत्तसंस्था
पत्नी चारचौघात अपमानास्पद बोलली म्हणून संतापाच्या भरात पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा शेततळ्यात फेकून खून केल्याची घटना तालुक्यातील निधोना शिवारात बुधवारी घडली. जगन्नाथ डकले असे पित्याचे नाव आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर सोशल मिडियावरील अफवांचा आधार घेत मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव या पित्याने केला होता.
निधोना शिवारातील शिवाजी पवार यांच्या शेतामध्ये तीन महिन्यांपासून सिल्लोड तालुक्यातील गव्हाण येथील जगन्नाथ डकले सालगडी म्हणून कामाला आहे. पत्नी प्रियंका, पाच वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या श्रावणीसह तो शेतात वास्तव्याला आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२८) सकाळी डकले कुटुंबीय शेतात काम होते. तेव्हा दीड वर्षाची मुलगी श्रावणी ही झोपल्याने तिला वडील जगन्नाथ याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरासमोरील झोळीत आणून टाकले. त्यानंतर तो पुन्हा शेतात महिला काम करत असलेल्या ठिकाणी गेला.
मात्र, तिकडे श्रावणी झोळीत एकटी असल्याने पत्नी प्रियंका ही जगन्नाथला चारचौघात अपमानास्पद बोलली. यापूर्वीही त्यांच्यात कुरबुर झालेली होती. त्यामुळे तेथून निघून येत संतापाच्या भरात जगन्नाथ याने झोपेतच असलेल्या श्रावणीला शेततळ्यात फेकून दिले. त्यानंतर जगन्नाथ याने श्रावणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. ही बाब परिचयातील राजू गायकवाड यांना सांगितली. त्यानंतर राजू गायकवाड यांनी ही माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपास सुरू केला. मात्र, पोलिसांना हे अपहरण नसल्याचा संशय आला. तेव्हा चौकशीत जगन्नाथ याने श्रावणीला शेततळ्यात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या मदतीने शेततळ्यातून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी जगन्नाथ डकले याला ताब्यात घेतले आहे.सोशल मिडियावर लहान मुलाच्या अपहरणाच्या अफवा सुरू आहेत. याच अफवांचा फायदा घेत जगन्नाथ डकले याने श्रावणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. सकाळपासून तो पोलिसांना मागील दोन दिवसांपासून शेताच्या गेटवर एक निळ्या रंगाची गाडी थांबत होती. त्याच गाडीवाल्याने मुलीचे अपहरण केले असेल असे सांगत होता. त्यानुसार जालना-निधोना रोडवरील एका इंग्लिश स्कूलचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी केली. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे उलट तपासणी केल्यानंतर त्याने श्रावणीचा खून केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.