एरंडोल प्रतिनिधी : बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे आज रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संपन्न झाले.
एकदिवसीय जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन प्रा.डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लाळगे यांनी केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याशिबिर प्रबोधन प्रसंगी स्वातंत्र्याची दोन आंदोलने, आधुनिक भारत, वर्तमान भारत, समाज व्यवस्था, शासन व्यवस्था, दुसरी गोलमेज परिषद, अश्या विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. दरम्यान, काही संघटना असफल का ठरल्या यावर भाष्य करताना राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम अलामे पुढे म्हणाले, निरूद्देश काम, साधनांचा अभाव, क्रांतीकारी विचार अन्य जातींमध्ये पसरला नाही. विचारांचे नाते सर्वात मोठे असते. डावपेच परिवर्तनशील असते, उद्देश परिवर्तनशील नसते.
निरंतर वाहणार्या धारेला विचारधारा म्हणतात. ज्यांची विचारधारा प्रस्थापित होते त्यांची व्यवस्था असते. इतिहास हा भविष्याचा वेध घेणारा असतो. असेही श्री.अलामे यांनी सांगितले. तद्नंतर प्रा.डॉ.भरत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, खऱ्या अर्थाने बामसेफ व सहयोगी संघटनेचे कार्य तथागत बुद्ध, संत नामदेव, गुरु रविदास, संत तुकाराम, बसवण्णा, छ.शिवराय, राष्ट्रपिता फुले, राजर्षी शाहुजी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब, साहित्यरत्न अण्णाभाऊ मान्यवर कांशीराम साहेब यांनी निर्माण केलेले न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आधारीत मूल्य जपणारे आहे. म्हणून संत महापुरुषांच्या सतत विचारधारेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. तसेच, कालसंगत आणि कालबाह्य विचारधारा असते. त्यामुळे कालसंगत विचारधारा स्विकारली पाहिजे. एकट्याने विचार केल्यास नकारात्मक वाढते. त्यामुळे सामूहिक विचार करायला हवा. निराशावादी विचारधारा कधीच सांगू नये. लोकांना जागृत करायला हवे. असेही प्रा. शिरसाठ म्हणाले. त्यानंतर सुमित्रा अहीरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, सामाजिक व्यवस्था परिवर्तन हे बामसेफचे दीर्घकालीन उद्देश आहे. ‘राष्ट्रपिता जोतीबा फुले आणि राष्ट्रनिर्माते भिमराव आंबेडकर’ आणि संत महापुरुषांची विचारधारा प्रमाण मानून वैचारिक परिवर्तन घडवून भौतिक जीवनात परिवर्तन घडविण्याबाबत आंदोलनात्मक प्रक्रिया त्याचा कार्याचा भाग आहे. बामसेफ ही संघटना देशव्यापी असून बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी मोर्चा, यांसह विद्यार्थी, डॉक्टर, वकील, अल्पसंख्यांक घटकांसाठी विवीध सहयोगी संघटना काम करीत असतात. यावेळी विचारमंचावर उद्घाटक प्रा. डॉ.भरत शिरसाठ, वक्ते घनशाम अलाणे, सुमित्रा अहिरे, कृष्णा धनगर, नगरसेवक सुलेमान पिंजारी, राकेश पाटील, मोहन शिंदे, रविंद्र लाळगे, सिराज कुरेशी, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, खुमानसिंग बारेला, दिपकराव बिवाल, सरपंच वावळदा राजू वाडेकर, सतिष शिंदे, राजेंद्र वाघ माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर बोरसे यांनी तर आभार आनंदा सूर्यवंशी यांनी मानले.