मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचे पदाधिकारी दसरा मेळाव्यात व्यग्र आहेत. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार असल्याने शिवसैनिक हा मेळावा जय्यत करून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरातून शिवाजी पार्कच्या दिशेने शिवसैनिक पायी निघाले आहेत. तर खरी शिवसेना आमचीच, असा दावा करणाऱ्या शिंदे गटानेही दसरा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे.
यासाठी शिंदे गटाने साडेचार हजार बसेस बुक केल्याचे सांगितले जात असून या गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दोन्ही मैदानांची क्षमता एक लाख लोकांची आहे. दोन्ही मैदानांची एक लाख लोकांची क्षमता उच्च न्यायालयाने ठाकरे गटालाच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी दिल्याने इरेला पेटलेल्या शिंदे गटाने आम्ही शिवसेनेपेक्षा मोठा मेळावा घेऊन दाखवण्याचा चंग बांधला आहे. बीकेसी येथील मैदानावर मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांवर शिंदेंकडून मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी दिली आहे. राज्यभरातून शिंदे गटाने ४५०० बसेस बुक केल्याची माहिती आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून पाच लाख लोकांना बीकेसी मैदानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेनेनेही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी मोठया संख्येने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर ऐतिहासिक गर्दी पाहायला मिळणार आहे.
शिवतीर्थावरच गर्दी होणार : नीलम गोऱ्हे दसरा मेळाव्याची कोणाला कितीही तयारी करू द्या, आम्हाला तयारीची गरजच नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. तसेच मनातील उर्मी ज्यांच्याकडे आहे, ते सर्व शिवतीर्थावर येणारच. शिवाय उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असलेले सर्वच शिवसैनिक हे शिवतीर्थावर येतील, शिवसेनेचे विचार ऐकायला मिळतील, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक शिवतीर्थावर येऊन शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचे यांनी सांगितले.
मेळाव्यांमुळे मुंबईची तुंबई होणार दोन्ही गटांच्या मेळाव्यांमुळे मुंबईसह उपनगरांत मोठी गर्दी होणार असल्याने पोलिस यंत्रणेवरही मोठा ताण पडणार आहे. पोलिस प्रशासनाकडून नियोजन बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गर्दी तसेच वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाला एसआरपीएफ, सीआरपीएफ आणि गृहदलाची मदत घ्यावी लागणार आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान परिसरात प्रत्येकी दहा हजार वाहने पार्किंगची सुविधा आहे. पण त्याहीपेक्षा जास्त वाहने येण्याची शक्यता पाहता उपनगरांतील मैदानांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.