नंदुरबार : वृत्तसंस्था
आलापल्ली-आष्टी मार्गावरील शांतिग्राम गावाजवळ सूरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बिजोली सुभाष जयदार (45 रा. कांचनपूर) असे मृत महिलेचे नाव असून अपघातात पती सुभाष जयदार थोडक्यात बचावले. या घटनेनंतर संतप्त जमावाने 10 पेक्षा अधिक ट्रकला आग लावून पेटवून दिल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल वाहून नेणाऱ्या शेकडो अवजड वाहनांमुळे आलापल्ली-चंद्रपूर मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सुभाष जयदार पत्नी बिजोलीसह आपल्या दुचाकीने कांचनपूरला जाण्यासाठी निघाले होते. शांतीग्राम जवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात बिजोली यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर पत्नीचा जीव गेल्याने सुभाष यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
दरम्यान संतप्त जमावाने मार्गावरील 10 पेक्षा अधिक अवजड वाहनांना पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु रात्री उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली नाही. उल्लेखनीय आहे की सुरजागड खाणीतून दररोज 400 ते 500 ट्रक्समधून कच्च्या लोहदगडांची वाहतूक केली जाते. त्यामुळे या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.
परिणामी नागरिकांमध्ये सूरजागडच्या कच्च्या लोहगडाच्या वाहतुकी विरोधात प्रचंड रोष असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. पोलिसांकडून घटनेची माहिती देण्यात आली नाही. दरम्यान खराब रस्ते आणि अवजड वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. कित्येकदा मागणी करूनही प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. सुरजागड खाणितून अतिरिक्त लोहदगड काढण्याचा प्रस्ताव लॉयड्स मेटल्सने सरकारला दिला आहे. त्यासंदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने 27 ऑक्टोंबर रोजी त्या भागातील नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र संबंधित क्षेत्रातील नागरिक व ग्रामसभांनी गडचिरोली येथील जनसुनावणीस प्रचंड विरोध केला असुन सदर जनसुनावणी ही एटापल्ली येथेच घ्यावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांना सहजपणे उपस्थित राहून आपले म्हणणे मांडता येईल. त्यासाठी स्थानिक नागरिक व ग्रामसभांनी केंद्र सरकार, राज्य सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी आणि संबंधितांना इमेलद्वारे पत्र आणि निवेदनं पाठविण्याची मोहीम सोमवार पासून सुरू करण्यात आली आहे