लाईव्ह महाराष्ट्र | शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रा.पं.च्या भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून चांगलीच गाजली. गावाच्या विकासाच्या व भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून गावाच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाच्या निर्देशानुसार दि.३० रोजी सदर शिरसाड ग्रा.पं.ची ग्रामसभा योजिली होती.दरम्यान सभा सुरू झाल्या पासून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रविण (गोटू) सोनवणे तसेच माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरून १४ व्या वित्तआयोगाचे २५ लाख रुपये खर्च करून खोटे बिले टाकल्यामुळे गावाचा पाहिजे त्या खर्चाच्या तुलनेत विकास झाला नाही या मुद्यावरून विरोध प्रदर्शित केला. या मुद्यावरून सभेत बराच गदारोळ माजल्याने सभा चर्चेचा विषय बनली.
ग्रा.पं.कडून झालेल्या खर्चाच्या संदर्भात कुठल्या ही प्रकारचे उत्तर ग्रा.पं.प्रशासनास देता आले नाही. तसेच कुठल्यही कामकाजाचे दप्तर सभेत दाखवले गेले नाही. त्या वरून सभा तहकूब करण्यात आली. सभेला सरपंच दिपक इंगळे, उपसरपंच राजेंद्र सोनवणे, ग्रामसेवक दिपक तायडे व कर्मचारी वर्ग तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याच प्रमाणे गावातील वार्ड क्र.४ मध्ये खूप मोठया प्रमाणात चिखल झाल्यामुळे धनंजय एकनाथ पाटील यांनी ग्रामपंचायतीला वार्ड क्र.४ मध्ये रेती टाकण्यासाठी १० हजार रुपयांची पावती मदत म्हणून दिली.