मुंबई : वृत्तसंस्था
शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारानं मविआ सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय मंत्रीमंडळात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे रखडलेल्या प्रलंबित उमेदवारांना आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.राज्यभरात 1064 उमेदवार रखडले होते त्यांना आज विविध पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले. या पदामध्ये तलाठी, नायब तहसीलदार, महावितरण अशा विविध पदाच्या भरत्या रखडल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे.
राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार. (अन्न व नागरी पुरवठा विभाग)
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)
नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना. (नगर विकास विभाग)
पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार (गृह विभाग)
इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)