लाईव्ह महाराष्ट्र दि. १ | जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुराच्या तडाख्याने अनेक शेतकऱ्यांची पशु संपत्ती मृत्युमुखी पडली आहे. तसेच शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांची शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाली असून या पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई रक्कम मिळण्यासंदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुरामुळे नुकसान ग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच जीवित नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना दर एकरी दोन ते तीन लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या गाईला ७० हजार, म्हशींसाठी एक लाख, बैलजोडीला दीड लाख, शेळ्यांना पाच हजार तर कोंबड्यांना एक हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. सोबतच या शेतकर्यांना पुन्हा शेतीसाठी प्रोत्साहन म्हणून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना त्वरित मदत न मिळाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंदू पाटील, ॲड सचिन पाटील, प्रवीण पाटील, ॲड योगेश पाटील, ॲड वैभवी पाठक, किशोर पाटील, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.