पुणे : वृत्तसंस्था
शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कालपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांकडून असा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर वातावरण पेटलं असून शिवसेनेने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी PFIच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्यामुळे शिवसेनेने पुण्यातीलच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत, लाथाबुक्क्या मारत फाडला. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तर सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरूवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकत जवळपास १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.
यानंतर आरोपींच्या चौकशीतून अनेक खुलासे होऊ लागले असून PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं ATSच्या तपासातून समोर आलं आहे.
याप्रकरणानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनी PFIच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपींना शोधून शोधून त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.