मुंबई : वृत्तसंस्था
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जे वृत्त माध्यमांमधून दिले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीची चर्चा आहे, ती भेट झालेली नाही. दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. ही भेट घेण्यापूर्वी खडसे यांनी संपूर्ण विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना सांगितला होता, अशी माहिती देत पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये जाणार, हे जे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. खडसेंनीही याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि महाराष्ट्रातल्या पक्षाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खडसे यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे अशी काही परिस्थिती नाही, असं महेश तपासे यांनी स्पष्ट केलं आहे.
दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे याना शिवाजीपार्कव म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे, या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची जवळपास गेल्या ४० वर्षांपासूनची परंपरा आहे. ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढे नेत आहेत. अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या दसरा मेळव्यातील भाषण ऐकत असतात. यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच आहे, असं तपासे म्हणाले.
महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्यासाठी बीकेसीवर मेळावा
राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारबाबत कायदेशीर पेच प्रसंग काय आहे. या सरकारवर अजूनही कायद्याने शिक्कामोर्तब झालेलं नाही. कदाचित येत्या २७ तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच शक्यता आहे. परंतु कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्यासाठी बिकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दसरा मेळावा घेण्याला हरकत नाही. पण दसरा मेळावा हा मूळचा शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा ठाकरेंची आणि शिवसेनेची आहे. पण वाद निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या विकोपाला राजकारण जाता कामा नये. महाराष्ट्राच्या ते हिताचं नाही. जनावरांमधील लंपीचा आजार, पुराची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.