औरंगाबाद : वृत्तसंस्था
प्रेमप्रकरणातून आलेले नैराश्य संपवण्यासाठी तरुणाने स्वतःलाच संपवण्याचा निर्णय घेतला. खोलीत जाऊन गळफास घेतला. मात्र, अचानक पोलिस पोहोचले अन् फासावर लटकलेल्या तरुणाला वाचवण्यात आले. ही कोणत्या चित्रपटाची गोष्ट नव्हे, तर औरंगाबाद शहरात घडलेली खरीखुरी घटना आहे.
वाढलेली स्पर्धा, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणातून आलेले अपयश यांसारख्या अनेक कारणांमुळे आजकाल आत्महत्या सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन, तरुण आपले मौल्यवान जीवन संपवत आहेत. शहरात यांसारख्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, शहरात नुकत्याच घडलेल्या घटनेने अनेकांना विस्मयित केले आहे.
‘देव तारी त्याला कोण मारी’ याचाच प्रत्यय पडेगाव भागातील या युवकाच्या बाबतीत आला. पडेगावातील सप्तशृंगी कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय युवकाने घरातील साडी उचलली आणि तो आतल्या खोलीत गेला. त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला. यावेळी त्याच्या भावाने तातडीने 112 नंबर डायल केला. यावेळी जवळील पोलिस ठाण्यातील छावणीच्या 112 गाडीवरील अंमलदार व्ही. बी. पंडित व एन. एस. तांबे हे युवकाच्या घरी पोहोचले.
आयसीयूत उपचार सुरू
छावणी पोलिस युवकाच्या घरी गेल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा युवकाने गळफास घेतला होता. एका पोलिसांनी युवकास उचलून धरले. दुसऱ्याने गळफास घेतलेली साडी कात्रीच्या सहाय्याने कापून काढली. फासावरून खाली उतरल्यानंतर युवकाच्या छातीवर प्रेशर करत त्यास शुद्धीवर आणले. आणि लगोलग त्याला उपचारांसाठी घाटीत दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
प्रसंगावधानामुळे वाचला जीव
छावणीचे निरीक्षक शरद इंगळे, विशेष पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांच्यासह अंमलदार पंडित व तांबे यांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. तरुणाच्या वडिलांना दुर्धर आजाराने निधन झालेले आहे. आई धुणीभांड्याचे काम करते. दुसरा एक भाऊ शिक्षण घेत असल्याची माहितीही छावणी पोलिसांनी दिली.