धरणगाव : प्रतिनिधी
मुले पळविणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसुन फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या ह्या अफवा असून कोणतीही टोळी मुले पळवणारी आपल्या पो.स्टे च्या हद्दीत नाही. म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. किंवा गावात येणारे भिक्षेकरी साधू, ज्योतिषी व इतर फेरीवाले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना मारहाण करणे, हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कोणीही करू नये. कोणत्याही बाबतीत कोणाचा संशय आल्यास गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आपले बीट अंमलदार पोलीस, बीट अधिकारी व पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधून माहिती द्यावी. परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये असे धरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.
तसेच पालकांसाठी महत्वाची सूचना देण्यात आली आहे. आपले अल्पवयीन पाल्य शाळा, शिकवणी किंवा इतर कुठही एकटे पाठवू नका, त्यांना सदर ठिकाणी सोडणाऱ्या ऑटो, बस, व्हॅन यांच्या चालकांची फोटोंसह संपूर्ण माहिती आपल्याकडे ठेवावी. ते आपल्या पाल्याला जबाबदारीने संबंधित ठिकाणीच व्यवस्थित सोडत असल्याची वारंवार खात्री करावी. कोणावरही प्रमाणा पेक्षा जास्त विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. तसेच आपल्या मुलांना ओळखी-अनोळखी व्यक्तीने दिलेले चॉकलेट, खाऊ किंवा इतर काहीही बाहेर खाऊ नये. त्यांना व्यवस्थित याबाबत समजावून सांगावे. अशा प्रकारचे आवाहन पो.नि राहुल खताळ यांच्याकडून करण्यात आले.