जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत पोलिसांचा खुलासा मागवला असून, या अर्जावर बुधवारी आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा हा अजामीनपात्र आहे. त्यात अटक होण्याची भीती असल्याने त्यांनी अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला.
गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह संवादाची क्लिप मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेऊन व कायदा सुव्यवस्थेचा विचार करून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सुरुवातीला बकालेंची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी बकालेंवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कलम १५३- ए १५३ – बी १६६, २९४, ५०० व ५०९ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी बकाले यांच्यातर्फे औरंगाबाद येथील अॅड. नीलेश एस. घाणेकर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या संदर्भात न्यायालयाने पोलिसांचा खुलासा बुधवारी (दि.२१) मागवला आहे. त्यानंतर बुधवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.
या गुन्ह्यात तीन वर्षाची शिक्षेची तरतूद
बकाले यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कलमात कलम १५३ अव १५३ ब हे दोन्ही कलम अजामीनपात्र आहेत. या कलमाने दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद असल्याची माहिती ॲड. सुधीर कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, किरणकुमार बकाले हे सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना अटक करण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.