सोलापूर : वृत्तसंस्था
आईने “शाळेत जा’ म्हटल्याचा राग आल्याने नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आयुष्य संपवले. झोका खेळता-खेळता लहानाचा मोठा झालेल्या लायप्पा व्हनमाने याने त्याच झोक्याच्या दोरीने गळफास लावून घेतला. नई जिंदगी परिसरातील शिवगंगानगर भाग ३ मध्ये सोमवारी ही हृदयद्रावक घटना घडली.
लायप्पा (१४) हा मूळचा मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील आहे. त्याचे आईवडील शेतमजूर आहेत. आईवडिलांनी लायप्पाला नई जिंदगी येथील त्याच्या मामाकडे लहानपणापासून शिक्षणासाठी ठेवले होते. मामा त्याच्याकडे विशेष लक्ष देत. नियमित अभ्यास करून घेत. मामाच्या घराजवळील शाळेत तो शिकण्यास होता. मामांकडे आईही आली होती.
मुलगा शाळेत जात नव्हता. सोमवारी सकाळी लायप्पाला आईने शाळेत जाण्याविषयी बजावले. शिकून मोठा होशील, नियमित शाळेत जात जा, असे म्हटले. ही गोष्ट त्या मुलाला खटकली. काही वेळाने त्याने झोक्याची दोरी लटकवलेल्या खोलीत, त्याच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. याच दोरीवर झोका खेळत लायप्पा लहानाचा मोठा झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. मुलाच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
पोलिस खात्यात भरती करण्याचे होते स्वप्न
लायप्पा नववीत शिकत होता. बारावीनंतर त्याला पोलिस खात्यात भरती करण्याचे आई-वडिलांचे स्वप्न होते. तो सर्वांशी मिळून मिसळून वागत होता. तो निडर होता, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.